सोलापूर (प्रतिनिधी): वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी हापूस आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या 3 हजार 100 हापूस आंब्याने श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रूप आज अधिकच खुलून दिसत आहे.
श्री विठ्ठलाप्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची मनमोहक आरास करण्यात आली आहे.”करोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी बा…’ अशी विठ्ठलाच्या चरणी श्री विठ्ठल भक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल), अजय साळुंखे (उद्योगपती पुणे), उमेश भुवा (सांगली), दीपक शहा (सांगली), आणि सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्याची पूजा अर्पण केली आहे.