जुन्नर – जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातले शेवटचे व उंचावरील हातवीज हे गाव सध्या तेथे येणाऱ्या सोनकीच्या फुलांमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. जुन्नरचे कास पठार म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या या गावाजवळील पठारावर पिवळ्या-जांभळ्या फुलांसह विविध, आकर्षक व रंगेबेरंगी फुले पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. काही दिवसांतच फुलांचे लांबलचक गालिचे पहावयास मिळतात.
याच ठिकाणी अनेक दगडाच्या शिळा संपूर्ण माळावर रहस्यमयरीत्या पसरलेल्या आहेत. यापैकी दोन मोठ्ठे दगड आपल्या गुणांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. लोखंडी दगड पर्यटकांना परिचित आहेत. दगडाच्या आवाजामागील रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. इंगळून-आंबे-हातवीज या मार्गाने पुढे गेल्यावर दुर्गावाडी गाव आहे. तेथे दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे.
तालुक्यातील अनेक भाविक दुर्गादेवीच्या दर्शनासाठी येथे आवर्जून येतात. येथूनच कोकण कड्याचे विहमंग दृश्य पाहू शकतो. जुन्नर तालुक्यात अनेक निसर्गरम्य, तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक ठिकाणे असून, पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी विविध रस्त्यांची कामे सुरू असून कामाच्या दर्जावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दत्ता गवारी यांनी व्यक्त केले आहे.