ओल्या कचऱ्यापासून जैव इंधन बनविण्याचा प्रस्ताव
सातारा (प्रतिनिधी) – नेदरलॅंडस्मधील वेस्ट ट्रान्सफॉर्मर या प्रथितयश फर्मने सातारा पालिकेला ओल्या कचऱ्यापासून जैव इंधन, खत निर्मिती व बहुपर्यायी जैविकांचा प्रस्ताव दिला आहे. या फर्मच्या पथकाने आज सातारा पालिकेला भेट दिली.
वेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या आशिया विभागाचे इशानवीर चौधरी, मुंबईचे धीरज लोखंडे व सातारा विभागाचे हेमंत कदम, अनिल अवघडे, इरफान पालकर, समीर बागवान, मनोज सोळंकी उपस्थित होते. या पथकाने पालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बांधकाम समितीचे सभापती मिलिंद काकडे, आरोग्य समितीच्या सभापती अनिता घोरपडे, नियोजन समितीचे सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणी पुरवठा समितीचे सभापती यशोधन नारकर, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, सुजाता राजेमहाडिक, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, सुनील काटकर, आरोग्य निरीक्षक कायगुडे उपस्थित होते.
नेदरलॅंडस्मधील वेस्ट ट्रान्सफॉर्मर ही फर्म ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्ट खत, इथेनॉल, वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी जगात सहा देशांमध्ये कार्यरत असून आशिया विभागाचे इशानवीर चौधरी, धीरज लोखंडे यांच्या पथकाने कराडचा शनिवारी दौरा केल्यानंतर रविवारी सातारा पालिकेला भेट दिली. सातारा पालिकेच्या सोनागाव कचरा डेपोत दररोज 42 टन कचरा जमा होतो. त्यामध्ये ओला कचरा 19 टन असतो. या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी ठेकेदारांच्या घंटागाड्या व इतर व्यवस्थेसाठी पालिकेला दरवर्षी अडीच कोटी रुपये मोजावे लागतात. चौधरी व लोखंडे यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
कचरा व्यवस्थापनासाठी फक्त पाचशे चौरस फुटांच्या जागेची आवश्यकता असून या आटोपशीर जागेत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जैव इंधन, कम्पोस्ट खत, इथेनॉल, वीजनिर्मिती होऊ शकते. घंटागाड्यांसाठीही जैव इंधन वापरले जाऊ शकते. त्यातू पालिकेची वीज व इंधनाची बचत होणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले. हा प्रकल्प शहरात विकेंद्रित पद्धतीने राबवता येऊ शकतो. वेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या सीईओ एप्रिल महिन्यात सातारच्या दौऱ्यावर येणार आहेत. ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून त्यावर चर्चा होईल, असे किशोर शिंदे यांनी सांगितले.