उन्हाळा वाढतोय? चला महाबळेश्‍वरला

आजही टिकून आहे थंड हवेचा लौकीक

महाबळेश्वर आणि पाचगणी म्हटलं कि चटकन आठवतं ते म्हणजे थंड हवेचं ठिकाण.पण एवढ्यावर महाबळेश्वरची ओळख थांबत नाही. इथे पाच नद्या उगम पावल्या असल्यामुळे हे मोठं तीर्थस्थळ आहे. छञपती शिवरायांनी अफझलखानाचा वध ज्या किल्याच्या पायथ्याशी केला तो प्रतापगड इथल्या पंचक्रोशीत येत असल्यामुळे मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची पान इथे आहेत. या गिरिस्थानाला शासनाने आता ‘ ब ‘ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. आजूबाजूला जावळीच्या खोऱ्यातील जंगल आणि मध्ये टुमदार असं महाबळेश्वर गिरिस्थान म्हणून अधिक लक्षवेधी आहे.

देश, विदेशातील लोकांना खुणावणारे पर्यटकांचे हे शहर आहे . इथे आलेला माणूस इथल्या पर्यावरणावर फिदाच होतो. हे भौगोलिक वातावरण पाहूनच ब्रिटीशांनी ब्रिटीश प्रेसिडेन्सीच्या काळात या गिरीस्थळाला जगाच्या नकाशावर प्रस्थापित केले. इथले हवामान युरोप मधील हवामानाशी मेळ खाणारे होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्व उच्च पदस्थ अधिकारी इथे राह्यला येत असत. त्यातून अनेक पाश्चिमात्य गोष्टी इथे रुजू लागल्या. त्यातील स्ट्रॉबेरी हे अतिशय लाडकं फळ त्याच संस्कृतीतून इथे आलं. आज देशातल्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यात होतं.

स्ट्रॉबेरी हे आरोग्याला पाचक आणि दिसता क्षणी तोंडाला पाणी आणणारे फळ आहे.जगात पहिल्यांदा फ्रांस मधील पाचवा चार्ल्स याच्या रॉयल गार्डन मध्ये १३४० मध्ये जंगलातून आणून या स्ट्रॉबेरीची १२०० रोपटी लावल्या गेली. या रोपट्याना आलेली फळं कोणी चाखली की नाहीत याचा उल्लेख कुठेही नाही, मात्र फ्रान्स मधील ब्रिटानी या शहरात १७५० मध्ये याची लागवड झाली आणि या फळाने युरोपातील लोकांच्या जीभेवर राज्य करायला सुरुवात केली.

महाबळेश्वरला गेलेल्या पर्यटकाने स्ट्रॉबेरी चाखली नाही हे अपवादानेच सापडेल. वाईचा घाट ओलांडून पाचगणीच्या जवळपास आल्यास जुन, जुलै मध्ये ढगांच्या करामती आणि हिरवाईने भरुन गेलेल्या दऱ्या, झिंगलेल्या माणसाची झोप उडविणाऱ्या आणि नव चैतन्य पेरणाऱ्या ठरतात. मोठमोठे पॉली हाउस लक्ष वेधून घेतात. गेल्या पाच एक वर्षापासून शासनाच्या मदतीने स्ट्रॉबेरीच्या रोपांसाठी हे पॉली हाउस शेतकऱ्यांनी उभे केले आहेत. आता पणन मंडळाच्या मदतीने परदेशातून रोपांची निर्यात केली जाते.

महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंच नद्यांचा उगम म्हणून सर्व परिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे.

परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा पर्यटकांना आनंद देतात.

संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे पर्यटकांची बारमाही गर्दी असते.

पाचगणी
पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण आहे. तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत असतात. पाचगणी पासून जवळच असलेलं स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळख असलेलं आणि मागच्या काही वर्षात पुस्तकाचे गाव म्हणून नावा रुपाला आलेले भिलार आणि बाजूची गावंही आता पर्यटकांनी बहरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.