मुंबई – ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांगरे-पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची बदली झाली आहे.
मिलिंद भारंबे यांची मुंबईत गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आता अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथक) म्हणून पदभार स्वीकारतील. तर नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून रुजू होतील.