असे घडले पुणे : विश्रामबागवाडा

शहराच्या मध्य भागातील हा ऐसपैस वाडा आणि त्याचा दर्शनी भाग सुरुवातीपासून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात त्यांनी हा वाडा नगरपालिकेला विकल्याची नोंद आढळून येते. विश्रामबागवाडा हा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. येथे सध्या टपाल कार्यालय, ग्रंथालय आणि काही कचेऱ्या संग्रहालय आहे. त्याचबरोबर पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय आहे. येथील “पुनवडी ते पुणे’ प्रदर्शन पर्यटकांना पाहता येते.

पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारी ही वास्तू पेशव्यांच्या काळापासून आजपर्यंत डौलाने उभी आहे. या वास्तूचे बांधकाम साधारण इ.स 1803 च्या सुमारास झाले. यासाठी त्याकाळी जवळपास दोन लाख रूपये खर्च आला होता. या वास्तूसमोर असलेल्या बागेवरून याला “विश्रामबाग’ असे नाव पडले असल्याचे समजते.

सुमारे 81 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद असा दुमजली वाडा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या वाड्याला मुख्य तीन चौक आहेत. त्याच्या सभोवती दिवाणखाने आहेत. वाड्याचा मुख्य दरवाजा आणि समोरचा दर्शनी भाग हे वाड्याचे मुख्य आकर्षण आहे. वाड्याच्या दोन्ही बाजूंना भक्कम भिंती आहेत. तर खांब, दरवाजा आणि खिडक्‍यांवर असलेली रेखीव नक्षी पेशवाई काळातील “स्थापत्यकलेची’ साक्ष देते. याचबरोबर तळमजल्यावरील कमान आणि मोठे नक्षीदार खांब देखील भव्यतेचे उदाहरण आहेत. वाड्याच्या बांधकामामध्ये भिंतीतील आणि एकमेकांना जोडणारे जिने, चौकोनी आणि भक्कम खांब यांची योजना केल्याचे दिसून येते. वाड्याची रचना पाहता वरच्या मजल्यावर दिवाणखाने, निवासांच्या खोल्यांची रचना असावी. दर्शनी भागामध्ये असणारी मेघडंबरी सर्वांचे लक्ष वेधून घेते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.