विशाल जाधव यांना मिळणार ‘शहिदा’चा दर्जा

स्थायी समोर प्रस्ताव सादर

पिंपरी – दापोडी दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना मरण आलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. महापालिकेच्या इतिहास ही घटना पहिल्यांदाच घडली असून, कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांना दिलेल्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महासभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या मजुराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल जाधव यांच्या अंगावर माती व दगड कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात विशाल यांचा मृत्यू झाला होता. त्यांना महापालिकेचे नियमित मदत मिळणार आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये अशीच घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना “शहिद’ म्हणून दर्जा देण्यात आला होता.

याच धर्तीवर आता विशाल जाधव यांचाही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आज (बुधवारी) झालेल्या सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र आजची सभा तहकूब झाल्याने हा विषय मंजूर झाला नाही. पुढील बुधवारी आजची तहकूब सभा होणार असून, त्यावेळी या विषयाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती स्थायीचे सभापती विलास मडिगेरी यांनी दिली. स्थायीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या महासभेसमोर ठेवण्यात येणार असून, त्या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

कर्मचारी महासंघाची मागणी
कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर विशाल जाधव यांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी अग्निशामक विभागातील कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने महापालिकेकडे केली होती. याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.