भारतीय विद्यार्थी व पालकांमध्ये घबराट
भारतीय दूतावासाने सुरू केली हेल्पलाईन
वॉशिंग्टन : अमेरिकेत विद्यापीठांतील शिक्षणाच्या नावाखाली तेथे बोगस व्हिसा देणाऱ्या एका टोळीचा तेथील होमलॅंड सिक्युरिटीने पर्दापाश केला असून या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यात 129 भारतीय विद्यार्थी आहेत. पे ऍन्ड स्टे या नावाने हा युनिव्हर्सिटी व्हीसा घोटाळा तेथे चालवला जात होता. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून दूतावासातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याची तेथे नेमणूक करून या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या मदतीचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
हा बोगस व्हिसा घोटाळा चालवणाऱ्यांमध्येही भारतीय टोळीचाच हात असल्याचे निष्पन्न होत आहे. अमेरिकेत अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकूण सहाशे विद्यार्थ्यांवर तेथील होमलॅंड सिक्युरिटीकडून लक्ष ठेवले जात असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. त्यांना विशीष्ट मर्यादेतच वावरण्यास सांगण्यात आले असून त्यांचा ठावठिकाण समजण्यासाठी त्यांच्या शरीरावर संपर्कासाठीचे टॅग लावण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टमस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले गुरूवारपर्यंत आम्ही एकूण 130 विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यातील 130 विद्यार्थी भारतीय आहेत. त्यांनी फारमिंगटन युनिव्हर्सिटी या बोगस विद्यापीठात प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे शिक्षणाच्या नावाखाली अमेरिकेतील वास्तव्याची मुदत वाढवून घेण्यासाठी अशा बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी होमलॅंड सिक्युरिटीनेच हे बोगस विद्यापीठ सुरू केले होते व तेथे प्रवेश घेणाऱ्यांना होमलॅंड सिक्युरिटी विभागाने त्वरीत अटक केली आहे.
या मागील टोळीच्या सूत्रधारांचाही तेथील तपास अधिकाऱ्यांनी तपास लावला आहे. अटक केलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवून दिले जाणार आहे आणि त्यांच्या अमेरिका प्रवेशाला बंदी घातली जाणार आहे अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली आहे. विद्यार्थी आहेत असे दाखवून अनेक जण अमेरिकेतील आपल्या मुक्कामाची मुदत वाढवून घेतात त्यासाठी ते कोणत्या तरी बोगस विद्यापीठात प्रवेश घेतात. त्यांना या प्रकरणात मदत करणाऱ्या आठ जणांची एक टोळीही गजाआड करण्यात आली आहे.