नवी दिल्ली – व्हिसा स्कॅमशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी केलेला खासदार कार्ती चिदंबरम यांचा अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.
कार्ती यांचे वडिल पी. चिदंबरम हे भारताचे गृहमंत्री असताना म्हणजे 2011 मध्ये 263 चीनी नागरिकांना व्हिसा मंजुर केल्याशी संबंधित हे प्रकरण आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने कार्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. कार्ती यांच्या विरोधात काहीही नसल्याचा दावा त्यांच्या वकीलाने केला होता. तो अमान्य करण्यात आला आहे.
कथित व्यवहार 2011 चा आहे आणि आता इतक्या वर्षांनी कार्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला असल्याकडे त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले होते. याबाबतचे मेल तपास संस्थेकडे होते. मात्र इतकी वर्षे त्यांनी काहीच तपास केला नाही. 50 लाख रूपयांचा हा व्यवहार पाहता चिदंबरम यांना जामीन दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आम्ही प्रकरणाचा तपास करू. मात्र त्यांना अटकेची भीती का आहे, असा सवाल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. चीनी नागरिकांना व्हिसा मंजूर करण्यासाठी कार्ती यांना 50 लाखांची दलाली मिळाल्याचा आरोप सरकार पक्षाने केला आहे.