खड्ड्यांमुळे कर्वे रस्त्याची अक्षरश: चाळण

मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद : वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी

पुणे – मेट्रोच्या कामामुळे अरूंद झालेल्या कर्वे रस्त्यावर खड्डे आणि ड्रेनेज चेंबरचा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या खड्ड्यांची दखल घ्यावी, अशी मागणी वारंवार होत असूनही त्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

कर्वे रस्ता येथे मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्‌स उभारण्यात आले असून, यामध्ये रस्त्याचा बराचसा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे येथून वाट शोधताना वाहनचालकांना त्रास होत असताना, पावसामुळे पडलेले खड्डे आणि ड्रेनेज चेंबरमुळे या त्रासात अधिकच भर पडत आहे.

खड्ड्यांमधून वाट शोधताना वाहनांची गती कमी केली जात असल्याने साहजिकच या परिसरात वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, ठिकठिकाणी कोंडी होत आहे. विशेषत: सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 ही वाहतुकीसाठी महत्त्वाची वेळ असून यावेळेत वाहनांचे प्रमाण सर्वाधिक असते. अशावेळी वाहतूक कोंडीने नागरिकांना अधिकच त्रासाचा सामना करावा लागतो.

नागरिक म्हणतात…
मेट्रोच्या कामामुळे थोडाफार त्रास होईलच हे मान्य आहे. मात्र, खड्डे आणि अर्धवट अवस्थेत असलेल्या ड्रेनेजचे काम पूर्ण करून ही परिस्थिती थोडीफार नकीच सुधारू शकते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हे खड्डे बुजवावेत आणि ड्रेनेज चेंबर दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी आणि वाहनचालक करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×