आभासी दुनिया आणि सुरक्षितता

हल्लीचे जग हे आभासी दुनियेत हरवलेले आहे, असे म्हटले तर फारसे चुकीचे होणार नाही. जाता येता आपण पाहत असतो, की आपल्या आजूबाजूचे लोक खास करून युवा पिढी स्वत:तच मग्न असते. कानाला हेडफोन आणि हाती मोबाईल हेच त्यांचे विश्‍व असते.

यामध्ये आपल्या मित्रांशी चॅट करणे, आपण बनवलेला व्हिडीओ किंवा लिहिलेले गीत पोस्ट करणे, आपल्याला ज्यात रुची आहे अशी माहिती मिळवणे, आणि जगात नवीन काय घडते आहे ते जाणणे, हे सर्व ऑनलाईन चालू असते. यात आनंद असतोच, पण या सर्वाला एक काळी बाजू पण आहे.

सायबर क्राईमच्या गोष्टी आपल्या वाचण्या-ऐकण्यात येत असतात. त्यात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीपासून ते वैयक्तिक बदनामीपर्यंत असंख्य गोष्टी असतात. एखादा अनोळखी मिस्ड कॉल आपले नुकसान करू शकतो. आपण सहजपणे केलेल्या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आपले ऑनलाईन फोटो, व्हिडियो, वैयक्तिक माहिती यांचा दुरुपयोग होण्याची शक्‍यता असते. आणि ते आपल्या नकळत होऊ शकते. तेव्हा त्याबाबतीत काही काळजी घेणे हिताचे

इंटरनेट सुरक्षितता म्हणजे केवळ आपल्या कॉम्प्यूटरमध्ये-मोबाईलमध्ये लेटेस्ट अँटिव्हायरस आणि फायरवॉल सॉफ्टवेअर आदी इन्स्टॉल केलेली असणे एवढेच नाही. त्या पेक्षा बरेच काही असते. आपण ऑनलाईन असताना स्वतःची किती काळजी कशी घेतो आणि इतर लोकांना (खास करून ऑनलाईन भेटणारे अनोळखी लोक) कशारीतीने सामोरे जातो. आपल्या अज्ञानाचा फायदा घेण्यास टपलेल्या ऑनलाईन घोटाळेबाजांच्या सापळ्यातून स्वतःचा बचाव कसा करतो हे महत्त्वाचे आहे. नेटवर भेटणारे लोक दिसतात वा भासतात तसे नेहेमी असतातच असे नाही. त्यामुळे ऑनलाईन सुरक्षित राहणेही महत्त्वाचे असते.

आपण ऑनलाईन असतांना पाळावयाचे काही मौलिक नियम
– आपली वैयक्तिक माहिती उदा. आपला पत्ता किंवा फोन नंबर देऊ नका. स्वत:ची चित्रे, फोटो कोणालाही पाठवू नका.
– अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल्स किंवा अटॅचमेंट्‌स उघडू नका.
– अनोळखी व्यक्तीचे ऑनलाईन फ्रेंड होऊ नका.
– ज्यांना ऑनलाईन भेटला असाल, अशा व्यक्तीला प्रत्यक्षात भेटायचे कधीही ठरवू नका.
– जर आपण ऑनलाईन पाहिलेले किंवा वाचलेले काहीही आपल्या काळजी करण्यासारखे वाटत असले, तर त्याची कोणाला तरी माहिती द्या किंवा त्यासंबंधी आपल्या आईवडिलांना कळवा.
– आजच्या सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर हल्ले करण्याचे नवनवीन मार्ग खुले झाले आहेत. महिला पुरुषांपेक्षा सायबर हल्ल्यांसाठी अधिक प्रमाणात असुरक्षित आहेत. सायबर दुनियेत ईमेल, मॉर्फिंग, सायबर बदनामी, सोशल नेटवर्किंग, हॅकिंग, सायबर-स्टॉकिंग, सायबर बीभत्स अश्‍लीलता, सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरी अशा विविध प्रकारे महिलांचा छळ केला जातो.
– आयएसईए-जागृती प्रोग्रामद्वारा युवा पिढी/विद्यार्थी यांना ऑनलाईन सुरक्षिततेसंबंधी नेहेमीच सूचना आणि टिपा दिल्या जातात. इंटरनेट वापरण्यापूर्वी या मार्गदर्शक सूचना/स्टेप्सचे पालन करा.

सायबर दुनियेत सर्वांसाठी आणि खास करून महिलांसाठी काही साध्या आणि झटपट सूचना-
– बनावट प्रोफाइलपासून सावध रहा.
– आपली ऑनलाइन गोपनीयता ठेवा.
– आपले अकौन्टचे सेटिंग्ज नियमितपणे तपासा.
– इतरांना आपल्या अकौंट मध्ये डोकावू देऊ नका.
– चॅट रूम्समध्ये भाग घेण्याचे टाळा, त्या आपल्यासाठी नाहीत.
– जर कोणी ऑनलाईन आपली स्तुती केली तर हुरळून जाऊ नका.
– आपल्या चित्रांना मिळालेल्या लाईक्‍सनी प्रोत्साहित होऊ नका आणि अजून चित्रे अपलोड करू नका.

– अश्‍विनी महामुनी

Leave A Reply

Your email address will not be published.