शरद पवार यांच्या वाढदिनी साताऱ्यात व्हर्च्युअल रॅली

सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त दि. 13 डिसेंबरपासून सलग आठ दिवस जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात शनिवारी (दि. 12) मान्यवर आणि शरद पवारप्रेमींच्या उपस्थितीत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथे आयोजित व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात व्हर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी, शरद पवारप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही उपस्थित राहण्याबाबत आवाहन करणार असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

सकाळी पावणेअकरा ते 2 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात शरद पवारांवर तयार केलेली फिल्म दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवर मनोगत व्यक्त करणार असल्याचे माने यांनी सांगितले. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 13 डिसेंबरपासून सलग आठ दिवस जिल्ह्यातील मुख्य शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. करोनाच्या काळात आवश्‍यक सूचनांचे पालन करुन विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.