मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी विरोधकांवर टीका करताना अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यातच आता चक्क पत्रकार परिषदेमध्ये संजय गायकवाड यांची जीभ घसरल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विरोधकांच्या एकजुटीसंदर्भात गायकवाड यांना प्रश्न विचारला. विरोधक आघाडी करुन तुमची राजकीय कोंडी करु शकतात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधक तुम्हाला लक्ष्य करु शकतात, अशा अर्थाने प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गायकवाड यांनी तीन हिंदी वाक्यांचा उच्चार केला. मात्र यापैकी एका वाक्यामध्ये त्यांनी विरोधकांची तुलना चक्क तृतीयपंथीयांशी केली. विरोधक युती करुन तुमची कोंडी करु शकतात असं विचारण्यात आलं असता गायकवाड यांनी, “वीरो के दुश्मन होते है, शेरों के ही दुश्मन होते हैं, हि** का कोई शत्रू होता हैं क्या?” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पुढे विरोधकांच्या युतीसंदर्भात बोलताना, “मला त्याचा काही फरक नाही पडतं. जे शिवसेना काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात सुरु असेल त्यावर एवढं सांगेन की सच्चा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. ज्यांच्या गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही,” असेही गायकवाड म्हणाले.
त्यानंतर पत्रकारांनी यापूर्वी तुमचं असं वक्तव्य होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांना कोणीही हरवू शकत नाही. या प्रश्नावर गायकवाड यांनी अगदी हातवारे करुन, “ते राजकीय स्टेटमेंट होतं,” असे हसत सांगितले. आता तुम्ही विधान फिरवाताय का? असा थेट प्रश्न पत्रकारांनी या प्रतिसादानंतर विचारला. त्यावर गायकवाड यांनी, “नाही स्टेटमेंट बदलण्याचा काही विषय नाही. तेव्हाही तोच विषय होता की जे शिवसैनिक बाळासाहेबांना मानतात त्यांचा हात तिकडे कधीच जाऊ शकत नाही. आता जे बाळासाहेबांचे नकली शिवसैनिक असतील किंवा जे फक्त ठेकेदारीसाठी गेले असतील अशांना काही फरक पडत नाही ते लोक कमर्शियल आहेत,” असा टोला लगावला.