केपटाऊन : न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार आणि सध्याचा कर्णधार राहुल द्रविडला मागे टाकले आहे.
केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने अतिशय संयमाने खेळ करत 79 धावा केल्या आणि भारतीय संघाचा डाव पुढे नेला. या सामन्याच्या पहिल्या डावात विराटने
भारताकडून सर्वाधिक 79 धावा करत आपल्या संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. एका बाजूने बाकिचे फलंदाज बाद होत असताना विराटने दुसर्या बाजून संयमी खेळ केला.
विराटने द्रविडला मागे टाकले
विराट कोहलीने, राहुल द्रविडच्या 624 धावा मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानावर पोहोचला. कोहलीला द्रविडला मागे टाकण्यासाठी 13 धावांची गरज होती. गेल्या सामन्यात न खेळल्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी विराटला एक सामना जास्त लागला.
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 15 कसोटी सामन्यांमध्ये 1161 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 शतके झळकली आहेत. राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेत एक शतक झळकावले आहे, तर कोहलीच्या नावावर दोन शतके आहेत.
धोनीची बरोबरी
विराट कोहलीने आपल्या दमदार खेळीने दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्येही त्याने ही कामगिरी केली आहे.
यापूर्वी चार वेगवेगळ्या देशांत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. 4 वेगवेगळ्या देशांमध्ये 1000 धावा करणारा धोनी पहिला भारतीय कर्णधार होता.