Virat Kohli to play Ranji Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरीही अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणे टाळत असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता विराट कोहली रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट जवळपास 13 वर्षांनी या स्पर्धेत खेळणार आहे.
यापूर्वी विराटने मानेच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता विराट रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफीमधील दिल्लीचा पुढील सामना 23 जानेवारीला सौराष्ट्रविरुद्ध आहे. मात्र, मानेच्या दुखापतीमुळे विराट हा सामना खेळू शकणार नाही. परंतु, 30 जानेवारीला होणाऱ्या दिल्ली विरुद्ध रेल्वेच्या सामन्यात विराट फलंदाजीसाठी मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.
विराटने शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता. त्यामुळे विराट या सामन्यासाठी मैदानात उतरल्यास जवळपास 13 वर्षांनी तो या स्पर्धेत खेळताना दिसेल. विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये 5 टेस्टमधील 9 इनिंग्समध्ये 23.75 च्या सरासरीने केवळ 190 धावा केल्या होत्या. तर न्युझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 15.50 च्या सरासरीने 93 धावा केल्या होत्या.
विराटसोबतच रोहित शर्मा देखील रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 जणांच्या संघात रोहित शर्मा, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा जवळपास 10 वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.