#CWC19 : विराट कोहलीकडून धोनीची पाठराखण

मॅंचेस्टर – महेंद्रसिंग धोनी याच्या संथ खेळाची मला बिल्कुल काळजी वाटत नाही. मैदानावरील त्याची उपस्थिती सर्व सहकाऱ्यांना प्रेरणादायक असेल, अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहली याने त्याची पाठराखण केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या संथ खेळामुळे धोनीवर टीका झाली होती. मात्र त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध धडाकेबाज अर्धशतक केले होते. कोहली याने सांगितले की, आम्ही काही खेळाडूंना विशिष्ट संघांविरुद्ध व विशिष्ट वेळी कसे खेळावे याबाबत सूचना करीत असतो. मात्र, हे खेळाडू त्यांच्या शैलीत फारसा बदल करीत नाही.

तरीही हे खेळाडू संघाच्या विजयात मौलिक कामगिरी करीत असतात. धोनी हा नेहमीच त्याच्या नैसर्गिक शैलीनुसार खेळतो. मला त्याची काळजी वाटत नाही. विंडीजविरुद्ध त्याची खेळीदेखील सामन्यास कलाटणी देणारीच होती. आमची धावसंख्या 250 च्या पुढे गेल्यामुळेच विंडीजचे मनोधैर्य खचले होते.

आम्ही क्षेत्ररक्षण करीत असताना धोनी याचा प्रत्येकाला मोठा आधार असतो. प्रतिस्पर्धी फलंदाजांची शैली व उणिवा याचा त्याला खूप अभ्यास असतो. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी याने संघास विजय दृष्टिपथात आणला होता, त्यावेळी मोहम्मद शमी याने नबी याला कसा चेंडू टाकला पाहिजे याबाबत धोनी याच्याकडून योग्य सल्ला मिळाला व त्यानुसार त्याने
गोलंदाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.