#ICCWorldCup2019 : दबावात केलेला खेळ महत्वाचा असणार – विराट

राऊंड रॉबीन पद्धत देखील आव्हानात्मक असणार

नवी दिल्ली  – येत्या 30 तारखे पासुन विश्‍वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असुन भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्‍वचषक स्पर्धा ही सर्वात महत्वाची स्पर्धा असुन या स्पर्धेत दबावाला चांगल्या प्रकारे जो हताळेल तोच संघ य स्पर्धेचा विजेता ठरेल असे विधान केले आहे.

यावेळी पुढे बोलताना विराट म्हणाला की, यंदाचा विश्‍वचषक हा माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक विश्‍वचषक वाटत आहे. कारण आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्‍वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्‍वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. वुइश्‍वचषक स्पर्धेसाठी प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता. या वेळी प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील उपस्थित होते. मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.

यावेळी पुढे बोलताना विराट म्हणाला की, आमचा संघ हा अत्यंत समतोल आहे. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्‍वचषकातील आमचे उद्देश्‍य आहे. जो संघ दडपणाचा चांगला सामना करू शकेल, तोच संघ विश्‍वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल असा मला विश्‍वास आहे. इंग्लंडमधील वातावरणापेक्षाही सामन्याचा आणि स्पर्धेचा दबाव पेलणे, हे महत्वाचे असणार आहे. आमचे सगळे गोलंदाज हे ताजेतवाने आहेत. कोणीही गोलंदाज थकलेले नाहीत. टी-20 सारख्या स्पर्धांमध्ये चार षटके फेकल्यानंतर कोणताही गोलंदाज थकलेला दिसला नाही. 50 षटकांच्या सामन्यातही गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आमचे ध्येय असणार आहे, असेही विराटने यावेळी स्पष्ट केले.

तसेच यावेळी पुढे बोलताना विराट म्हणाला की, 1992 नंतर प्रथमच ही स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा विश्‍वचषक हा यापूर्वीच्या स्पर्धांपेक्षा अधिक आव्हानात्मक असेल. तसेच या फॉरमॅटमुळे स्पर्धेतील चुरस अधिक वाढवली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली आहे. 2015 नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीने आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्ट्या कशा आहेत यापेक्षा तणाव कसा हाताळतो, हे महत्त्वाचे आहे.

इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणे हे खूप वेगळे असणार आहे. आम्ही विश्‍वचषकात पूर्ण क्षमतेने खेळू. दबावातही आम्ही चांगली कामगिरी करू. किंबहुना ते आम्हाला करावेच लागले. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टी 20 क्रिकेट यात खूप फरक आहे. कुलदीपला आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, हे चांगले झाले. कारण हे जर विश्‍वचषकात झाले असते तर सुधारणेला वाव नव्हता. पण आयपीएलच्या अनुभवातुन त्याला नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची हे समजले आहे. तो विश्वचषकात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)