हॅमिल्टन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तो कोणता तरी विक्रम करतो. न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीदरम्यान विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-या भारतीय कर्णधारांच्या यादीत कोहलीने माजी कर्णधार सौरभ गांगुलीला मागे टाकले आहे.
विराटने न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याचवेळी त्याने सौरभ गांगुलीला मागे टाकले. विराटने कर्णधार असताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१२३ धावा केल्या आहेत. गांगुलीने १४८ सामन्यांत ५०८२ धावा केल्या आहेत.
विराटला हा टप्पा गाठण्यासाठी ८७ सामने लागले. त्याने ७६.४६ च्या सरासरीने या धावा काढल्या असून , यात २१ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय कारकिर्दीत विराटने २४६ सामने खेळताना ११,८४३ धावा केल्या असून यात ४३ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय :
१) महेंद्रसिंग धोनी : ६६४१ (१७२ डाव)
२) महंमद अझरूद्दीन ५२३९(१६२ डाव)
३) विराट कोहली ५१२३(८३ डाव)
४) सौरभ गांगुली ५०८२(१४२ डाव)