#CWC2019 : भगव्या जर्सीबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणतो की…

लंडन – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ हा 12 व्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळत आहे. त्यातच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी वापरणार आहे. या जर्सीबद्दल शुक्रवारी बीसीसीआयने अधिकृत जाहीर केलं होतं.

शनिवारी जर्सीवर भारतीय कर्णधार विराट कोहली याने माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने नव्या रंगातील जर्सी आपल्याला आवडली असल्याचं म्हटलं आहे. या जर्सीचा त्यानं आपल्या ट्विटर अकाउंट फोटो देखील शेअर केला आहे.

जर्सी बदल प्रतिक्रिया देताना कोहली म्हटला की, ‘मला जर्सी आवडली, जर्सीमधील रंगसंगती खूपच छान आहे. भारताची जर्सी निळ्या रंगाचीच असावी. एका सामन्यापूरतं ठीक आहे. पण निळ्या रंगाची जर्सी ही आपली ओळख आहे ती कायम रहावी. आम्ही ती परिधान करतो हे आमच्यासाठी अभिमानस्पद आहे. मला नाही वाटत की सर्व सामन्यासाठी जर्सी बदलली पाहिजे’.

पुढे तो म्हणाला की, जर्सी चांगली दिसत आहे. एका सामन्यासाठी खूपच छान आहे. तसेच एक स्मार्ट किट आहे असंही विराटने सांगितलं.

दरम्यान, टीम इंडियाला जर्सीतील हा बदल करावा लागला आहे कारण की, आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. यामुळेच भारतीय संघ आपल्या नेहमीच्या जर्सीशिवाय दुसऱ्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.