लंडन – भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली याने 20 जून रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 11 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यानेच आपल्या या वाटचालीला उजाळा देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला लाखो चाहत्यांनी लाईक्स दिल्या आहेत. तसेच त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले असून अपयशी कालखंड संपून पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर जाण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Time flies 🇮🇳#20June #TestDebut pic.twitter.com/eIktcGLg6i
— Virat Kohli (@imVkohli) June 20, 2022
कोहलीने 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या व्हिडिओत कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाटचाल दाखवण्यात आली आहे. रन मशीन असे संबोधले जात असलेल्या कोहलीने हा 17 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत आपण इंग्लंडमध्ये भरात येऊ असा विश्वासही दिला आहे.
कसोटीबाबत सांगायचे तर कोहलीने आतापर्यंत 101 सामने खेळले असून 49.95 च्या सरासरीने 8 हजार 43 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 27 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. कोहली सध्या सातत्याने अपयशी ठरत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीला एकही शतकी खेळी करता आलेली नाही. तरीही चाहत्यांनी त्याला पाठिंबाच दर्शवला असून इंग्लंडमध्ये त्याची बॅट तळपेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. कोहलीने त्याचे अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक 2019 साली बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीत फटकावले होते.