Virat Kohli injury Update: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने 4 विकेट राखून इंग्लंडचा पराभव केला. मात्र, या सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकला नाही. कोहली दुखापतीमुळे अचानक सामन्यात खेळू न शकल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाली. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तरी विराट मैदानावर उतरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आता उपकर्णधार शुभमन गिलने महत्त्वाची माहिती दिली आहे.
गिलने कोहली दुसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या सामन्यावेळी कर्णधार रोहित शर्मा यांनी टॉसदरम्यान सांगितले की, विराट कोहलीला गुडघ्याची समस्या जाणवत असल्यामुळे तो सामन्यात खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी नागपूरमधील सामन्यात श्रेयस अय्यरला खेळण्याची संधी मिळाली.
कोहलीच्या दुखापतीबाबत माहिती देताना शुभमन गिलने सांगितले की, ‘जेव्हा कोहली सकाळी उठला, तेव्हा गुडघ्याला सूज आली होती. कालच्या सराव सत्रापर्यंत तो पूर्णपणे ठीक होता. चिंता करण्यासारखे काहीही नाही. पुढच्या सामन्याआधी तो नक्कीच तंदुरुस्त असेल.
गिलने दुखापतीबाबत माहिती दिल्यानंतर आता विराट 9 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 47.4 ओव्हरमध्ये सर्वबाद 248 धावा केल्या. तर भारताने 38.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले. भारताकडून गिलने 87 धावांची शानदार खेळी केली. तर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकीय खेळीचा भारताच्या विजयात मोठा वाटा होता.