नवी दिल्ली – कोणाचे नशीब पाहा कसे असते. एकीकडे करोनामुळे बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे घरातच बसलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर विविध पोस्ट करून तब्बल साडेतीन कोटी रुपयांची कमाई केली आहे.
करोनाच्या धोक्यामुळे देशवासीयांना आपापल्या घरातच राहावे लागत आहे. अशा स्थितीत अनेकांना आर्थिक समस्या जाणवू लागल्या आहेत. कोहलीसाठी मात्र, हा काळ संकटातून संधी निर्माण करणारा ठरला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर या सोशल मीडियाकडून कोहलीला सातत्याने पोस्ट करण्याचा करार करण्यात आला व त्यातून कोहलीने ही कमाई केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहावे लागत असलेल्या काही खेळाडूंचे अशा कंपन्यांशी करार झाले व त्यातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 खेळाडूंची एक क्रमवारी ठरविण्यात आली. त्यात कोहलीच्या रूपाने एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. घरातून कुठेही बाहेर न जाता कोहलीने ही कोटींची उड्डाणे केली आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत कोहली सहाव्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर तर कोहलीने आजवर गेल्या तीन महिन्यांत केवळ 3 पोस्ट केल्या असून त्यातून त्याला साडेतीन कोटींची कमाई झाली आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या प्रत्येक पोस्टसाठी त्याला 1 कोटी 20 लाख रुपये मिळाले आहेत.