Happy Birthday Virat Kohli : विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वय आता 36 वर्षे आहे, दीड दशकाहून अधिक काळातील कारकिर्दीत त्याने 27 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके झळकावली आहेत, परंतु 2024 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीवर डागासारखे आहे ज्यामध्ये तो तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळूनसुध्दा एकूण 500 धावाही करू शकला नाही.
आता प्रश्न असा आहे की, 2025 ची सुरुवात ही कोहलीच्या कारकिर्दीतील एका नवीन टप्प्याची सुरुवात होणार आहे का आणि तो 2025 ला स्वतःसाठी संस्मरणीय आणि अद्भुत कसे बनवू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीचा रेकॉर्ड आहे उत्कृष्ट…
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप भारत सरकारने स्पष्ट केलेले नाही. जर भारत या स्पर्धेत सहभागी झाला तर सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची सरासरी 88.16 आहे. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 529 धावा केल्या आहेत. कोहलीला आयसीसी टूर्नामेंटमध्ये धावा करायला आवडतात, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भरघोस धावा करून कोहली 2025 हे वर्ष स्वतःसाठी चांगले बनवण्याचा पाया रचू शकेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.
2025 ची होईल चांगली सुरुवात…?
भारतीय संघ 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने करणार आहे. इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर येईल, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने खेळले जातील. टी-20 फॉरमॅट, एकदिवसीय किंवा टेस्ट क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करायला आवडतात. कोहलीची इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये धावा करण्याची सरासरी 38 पेक्षा जास्त आहे, पण टी-20 विश्वचषक 2024 नंतर विराट टी-20 मधून निवृत्त झाला आहे.
विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लिश संघाविरुद्ध 1,300 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय तो लवकरच इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 2 हजार धावा पूर्ण करणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धची मालिका कोहलीला पुन्हा योग्य मार्गावर आणू शकेल, अशी आशा बाळगणे चुकीचे ठरणार नाही.