मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्यांचे पती क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आता कोविड ग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारणीत पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यासाठी स्वताची दोन कोटी रूपयांची मदत घोषित केली आहे.
सोशल मीडियात या संबंधात एक व्हिडिओ पोस्ट करून या दाम्पत्याने म्हटले आहे की, आम्ही केट्टो या फंड रेझींग प्लॅटफॉर्मशी सहयोग करून निधी संकलनात हातभार लावणार आहोत. या अभियानातून सात दिवसांत सात कोटी रुपये जमवण्याची योजना आहे. त्यासाठी लोकांनी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपण एकत्र येऊनच या परिस्थितीवर मात करू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. कोविड काळात सेलिब्रेटींच्या निष्क्रियतेवर सध्या सोशल मीडियात जोरदार टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या दाम्पत्याने कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे.