हॅमिल्टन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तो कोणता तरी विक्रम करतो. न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटीत पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये हेन्री निकोल्सचा झेल पकडला. हा झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला कोहलीचा २५० वा झेल ठरला. यासह विराटने अझरूद्दीन, द्रविड आणि सचिन यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय ठरला आहे.
भारताकडून सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावांवर आहे. राहुल द्रविडने एकूण ३३४, अझरूद्दीनने २६१ तर सचिन तेंडूलकरने २५६ झेल पकडले आहेत.