Satara । थंडीमुळे सातार्यात विषाणूजन्य आजार बळावले

सातारा,– गेले काही दिवस हवामानात वारंवार बदल होत आहे. थंडी पडल्याने विषाणूजन्य साथीचे आजार बळावले आहेत. फ्ल्यूसह विविध आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
जिल्ह्यात थंडी पडली असून, हवामानात बदल होत आहे. पहाटे थंडी, दिवसा ऊन अशा हवामानामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासह तापाने नागरिक बेजार झाले आहेत. सरकारी दवाखाने व खासगी रुग्णालयांमध्य रुग्णांची संख्या वाढत आहे. हवामानात वारंवार होत असलेले बदल बालके आणि वयोवृद्धांना सहन होत नाहीत.
त्यामुळे लहान मुले ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. हवामानातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक तेवढ्या चटकन जुळवून घेत नसल्याने आरोग्य बिघडत असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे डॉक्टरांनी सांगितले.





