व्हीआयपींची सुरक्षा काढणे हे सूडाचे राजकारणच

पहा कुणाला दिली आणि कुणाची रद्द केली सुरक्षा...

मुंबई – अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना राज्य सरकारच्या स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपमार्फत देण्यात येणारी सुरक्षा महाविकास आघाडी सरकारने काढली असून त्यामुळे वादाचे मोहोळ उठलेले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात येत आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात येईल. सरकारचा हा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महाविकास आघाडीही कुजक्‍या मनाचीच…
महाविकास आघाडी सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. यावरुन मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली म्हणाल्या, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे, त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण कुजक्‍या मनाचीच निघाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, ओबीसी आरक्षण समितीचे प्रकाश शेंडगे यांना एक्‍स दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे.

दरम्यान, कोणतेही घटनात्मक पद नसलेल्या युवासेनेचे प्रमुख वरुण सरदेसाई यांना सरकारतर्फे सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ‘वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्‍य मुख्यमंत्रांनी एकदम गांभीर्यानी घेतलेले दिसतंय…’ असे देशपांडे म्हणाले.

यांची सुरक्षा घेतली काढून…
अंबरीशराव अत्राम, संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मारोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वाय प्लस एस्कॉर्टसह वाय प्लस, वाय आणि एक्‍स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

यांची सुरक्षा वाढवली…
विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार,शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस एस्कॉर्टसह आमदार वैभव नाईक यांना एक्‍स, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची, तर यू.डी.निकम यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.