खार्किव्ह: जगावर तिसऱ्या युद्धाचे सावट निर्माण करणारे रशिया आणि युक्रेनचे युद्ध कोणत्याही पर्यायाने थांबत नसल्याचे दिसत आहे. या युद्धाला आता दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. रशिया युक्रेनवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी देशातील अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करत आहे. तसेच आपल्या सैन्याच्या माध्यमातून शहरे ताब्यात घेत आहे. मात्र याला युक्रेनचे नागरिक तेवढ्याच तीव्रतेने लढा देत असल्याचेही दिसत आहे. रशियन सैन्याला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनच्या नागरिकांनी अत्यंत जहाल उपाय अंमलात आणला असल्याची माहिती सामोर आली आहे.
रशियाच्या सैनिकांनी खार्किव्हजवळ इझियममध्ये मोठे नुकसान केले तसेच नागरिकांवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली. मात्र या सैनिकांच्या विरोधात इथले नागरिक एकवटले असून त्यांनी सैनिकांच्या विरोधात आक्रमकपणे लढाई सुरु केली आहे. यासाठी स्थानिकांनी रशियाच्या सैनिकांना केकमधून विष दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहिती, युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकांना केक आणि वाईनमधून विष देऊन ठार केले आहे. याबाबतचा खुलासा खुद्द युक्रेनच्याच गुप्तचर संस्थेने केला असल्याचे सांगण्यात आले आहे. खार्किव्हजवळील इझियममध्ये नागरिक रशियन सैनिकांविरुद्ध लढत आहेत.
तसेच युक्रेनच्या संरक्षण गुप्तचर संचालनालयाने, “स्थानिकांनी तिसऱ्या रशियन मोटर रायफल डिव्हिजनसाठी केक बेक केला होता. यात त्यांना विष देण्यात आले. परिणामी, दोन रशियन सैनिकांचा मृत्यू झाला तर 28 जण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. एवढेच नाही तर, बनावट मद्य प्यायल्याने 500 सैनिक रुग्णालयात दाखल आहेत”, असा दावाही केला आहे.