इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये दोन गटामध्ये वाद झाला असून या वादातून झालेल्या गोळीबारात तब्बल १० जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद आदिवासी भागामध्ये जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यासाठी झाला असून यातून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम भागात ही घटना घडली असून पेशावरपासून २५१ किमी अंतरावर असलेल्या खुर्रम जिल्ह्यातील तेरी मेगल गावात राहणाऱ्या गैदू टोळीच्या लोकांनी सरपणासाठी लाकूड गोळा करणाऱ्या पेवार टोळीच्या सदस्यांवर गोळीबार केला.
या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली असून ते म्हणाले की, खुर्रम जिल्ह्यातील सबडिव्हिजवनमध्ये जंगलातील मालकी हक्कावरून दोन गटांमध्ये वाद आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू होता. या धुमश्चक्रीमध्ये चार जणांचा मृत्यू शनिवारी तर सहा अन्य लोकांचा मृत्यू पेवार समुदायाच्या लोकांना रविवारी केलेल्या प्रतिहल्ल्यात झाला. बंदुकधाऱ्यांनी लपून हल्ला केला. यावेळी दोन्हीकडून मोठी हत्यारे आणि रॉकेल लाँचरचा वापर झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही समुदायामधील जेष्ठ व्यक्ती आणि सरकारी अधिकारी गैदू आणि पेवार टोळीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलीस आणि निमलष्करी दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. माहिती मिळेपर्यंत दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली.