थुतूकुडी (तामिळनाडू), दि. 22- द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी थुतूकुडी गावामध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांचे मिळून 600 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गीता जीवन आणि चेलप्पा या दोन आमदारांचाही समावेश आहे. थुतूकुडी गावामध्ये आपल्या पक्षाचा ध्वज उभारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये ही हाणामारी झाली होती. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना जोरदाऱ लाठीमार करावा लागला होता.
मार्कंडेय नावाचे स्थानिक नेते अद्रमुक पक्ष सोडून अलीकडेच द्रमुकमध्ये दाखल झाले आहेत. थुतूकुडीमध्ये द्रमुकचा ध्वज उभारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. त्यासाठी पोलिसांकडून परवानगीदेखील घेतली गेली होती. करोनाच्या साथीमुळे 200 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली गेली होती. मात्र, नियोजित ध्वजस्तंभाजवळच अद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता अद्रमुकचा ध्वज उभारण्याचा घाट घातला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकल्यावर तणाव वाढत गेला आणि त्याचे पर्यावसन प्रचंड हाणामारीमध्ये झाले.