ठिकठिकाणी रक्तपात; 70 हून अधिक ठार
बगदाद- इराक मध्ये महागाई आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्याच्या विरोधात देशभर उग्र निदर्शने सुरू आहेत. या निदशर्नांच्यावेळी झालेल्या हिंसाचारात 70 हून अधिक जण ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इराकचे धार्मिक नेते मोक्तदा सद्र यांनी इराकी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गेले चार दिवस ही निदर्शने सुरू आहेत. ती निदर्शने दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारी फौजांनी केला आहे. त्यातून मोठा हिंसाचार होत असून त्यात आत्ता पर्यंत 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे तेथील मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.
दंगल व हिंसाचारात एकूण 1600 जण जखमी झाले असून इराक मध्ये निदर्शक आणि सरकारी फौजांमध्ये मोठीच धुमश्चक्री झाल्याचे पहायला मिळत आहे. सरकारने आणखी रक्तपात टाळण्यासाठी त्वरीत राजीनामा द्यावा आणि संयुक्तराष्ट्रांच्या देखरेखेखाली निवडणूका घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. बगदाद मध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या. त्यात किमान दहा जण ठार झाले आहेत.
दरम्यान इराकी सरकारने युवकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. नवीन सरकार सत्तेवर येऊन जेमतेम एक वर्षही झालेले नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला अजून पुरेसा वेळ द्या असे आवाहनही त्यांनी केले. बगदाद मधील निदर्शकांवर करण्यात आलेल्या गोळीबारामुळेच हिंसाचाराचा वणवा भडकला असून या हिंसाचाराला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.