हिंसाचार, ईव्हीएममधील बिघाड अन्‌ मतदारांची नावे गायब…

पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला गालबोट
नवी दिल्ली – हिंसाचाराच्या काही घटना, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) बिघाड आणि मतदारयाद्यांमधून नावे गायब असल्याच्या तक्रारींमुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले.

जगातील सर्वांत मोठी निवडणूक प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा प्रारंभ काहीसा गोंधळातच झाला. आंध्र प्रदेशात सत्तारूढ तेलगू देसम आणि विरोधी वायएसआर कॉंग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन ठिकाणी आयईडीचे स्फोट घडवले. त्यातील एका स्फोटात निवडणूक पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले 2 पोलीस कमांडो जखमी झाले. छत्तिसगढमध्येही नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. सुदैवाने त्यात कुणालाही इजा पोहचली नाही. त्या राज्यातील दुसऱ्या घटनेत नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झडली. त्यात एक नक्षलवादी मारला गेला, तर एक जवान जखमी झाला.
काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्याशिवाय, अनेक मतदारांनी त्यांची नावेच मतदारयाद्यांमध्ये नसल्याच्या तक्रारी करत नाराजी व्यक्त केली. आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासकीय आणि इतर त्रुटींबद्दल गाऱ्हाणे मांडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.