ढाका – बांगलादेशात हिंसक निदर्शकांनी वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्यानंतर आवामी लीगच्या नेत्यांच्या घरांवरही हल्ले केले गेले. जमावाने देशभरातील या नेत्यांच्या घरांची जाळपोळ केली. शेख मुजीबूर रहमान यांच्या भित्तिचित्रांचीही तोडफोड आणि विद्रुपीकरण करण्यात आले. देशभरातील तब्बल दोन डझन जिल्ह्यांमध्ये ही तोडफोड करण्यात आली, असे बांगलादेशातील माध्यमांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक ऑनलाइन भाषण दिल्यानंतर ही तोडफोड करण्यात आली.
अवामी लीगचे अध्यक्षीय सदस्य शेख सेलीम यांच्या ढाका येथील बनानी येथील घराला शुक्रवारी आग लावण्यात आली. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास आग लावण्यात आली, मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने अग्निशमन दलाला उशीर झाला आणि पहाटे पर्यंत घटनास्थळी पोहोचू शकले नाही. जमावाने अग्निशामक दलाला घटनास्थळी वेळेवर पोचू दिले नाही, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेख मुजीब यांचे धानमंडी-३२ येथील निवासस्थान गुरुवारी जाळण्यात आल्यानंतर आणि तोडून टाकल्यानंतर, आंदोलकांनी अवामी लीगचे सरचिटणीस आणि माजी रस्ते, वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादर यांच्या नोआखलीच्या कंपनीगंजमधील घरावरही हल्ला केला. तेथेही तोडफोड केली आणि आग लावली. दुपारी १ वाजता दुमजली घराची तोडफोड केली गेली आणि कादर यांचे धाकटे आणि आवामी लीगचे प्रचार प्रमुख असलेल्या बंधू अब्दुल कादर मिर्झा यांच्या पत्र्याचे छप्पर असलेल्या खोल्यांची तोडफोड करण्यात आली. घरासमोर उभ्या असलेल्या कारलाही आग लावण्यात आली. यावेळी घरी कोणीही नव्हते.
राजशाही भागात माजी विदेश राज्यमंत्री शाहरियार आलम यांच्या तीन मजली घरालाही आग लावण्यात आली. मोटरसायकलवरून आलेल्या सुमारे १०० जणांनी ही जाळपोळ केल्याचे साक्षीदारांनी सांगितले. याशिवाय आवामी लीगचे नेते अबू सईद यांच्या घराची, मोटरसायकलचीही जाळपोळ केली गेली. सईद यांच्यावर जुलै महिन्यात आंदोलकांवर हल्ल्याचे आदेश देण्याचा आरोप होता. या गोळीबारात दोन विद्यार्थी ठार झाले होते. या घटनेपासून सईद भमिगत आहेत.
कुमिला येथे शेख मुजीबूर रहमान यांची दोन भित्तीचित्रे आंदोलकांनी पाडून टाकली. न्यायालयासमोरील म्युरलही बुलडोझरने पाडून टाकण्यात आली. फॅसिझमची सर्व चिन्हे पाडून टाकली जातील, असे कुमिला सिटी युनिट ऑफ स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनचे सचिव रशेदुल हक म्हणाले, नारायणगंज आणि नरसिंगडी येथील कोर्टाच्या आवारातील तसेच बागेरहाट, मोंगला येथील मुक्तीजोधा भाबन येथील शेख मुजीबूर यांचे अर्धपुतळे पाडून फोडण्यात आले. आवामी लीगच्या १० विद्यार्थी कार्यकर्त्यांवरही हल्ले केले गेले. आंदोलकांनी बारिशाल प्रेस क्लबमधील शेख मुजीब यांचे भित्तिचित्रही फोडले.
राज्यघटना रद्द करणार –
बांगलादेशची १९७२ ची राज्यघटना रद्द केली जाईल. मुजीबूर यांची राज्यघटना गाडून टाकली जाईल. तसेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुजीब यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत देखील बदलण्यात येईल, असे विद्यार्थ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांना बांगलादेशात स्वातंत्र्य चळवळीचे नायक मानले जाते. मात्र हसीना यांच्याबद्दलच्या रागामुळेच देशभरात मुजीबूर यांच्यावरही रोष व्यक्त होतो आहे. बांगलादेशातील आंदोलक पुतळे, इमारती पाडू शकतील, मात्र इतिहास नष्ट करू शकणार नाहीत, अशा शब्दात हसीना यांनी या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.