लाल किल्ल्यावरील हिंसाचार भाजपनेच घडवला – केजरीवाल यांची टीका

मीरत – प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅली दरम्यान दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार भाजपनेच घडवला असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. शेतकरी आंदोलक हे देशविरोधी नसून त्यांचा केवळ वादग्रस्त कृषी कायद्यांना विरोध आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे हे शेतकरी नव्हते. ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते होते, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

ट्रॅक्‍टर रॅली दरम्यान शेतकरी आंदोलक लाल किल्ल्याजवळील अडथळे तोडून लाल किल्ल्यामध्ये गेले होते. ट्रॅक्‍टर रॅली दरम्यान दिल्लीत आणि लाल किल्ल्यावरही आंदोलकांचा सुरक्षा रक्षकांबरोबर जोरदार हिंसाचार झाला होता. या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर आपल्या संघटनेचा झेंडाही फडकावला होता. मात्र या हिंसक आंदोलनामागे भाजपच असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

ट्रॅक्‍टर रॅली दरम्यान शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चुकीचा रस्ता दाखवला गेला होता. त्यांना दिल्लीतील रस्ते माहिती नव्हते. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे भाजपचेच कार्यकर्ते होते. मात्र देशविरोधी कारवाया करण्याबद्दल भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांविरोधात खटले दाखल केले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले आहे. ब्रिटीशांनाही असे धाडस दाखवता आलेले नव्हते, असे केजरीवाल म्हणाले.

सरकारने मंजूर केलेले कृषी विषयक कायदे हे शेतकऱ्यांसाठी “डेथ वॉरंट’ असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन 3-4 भांडवलदारांना द्यायच्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्याच शेतामध्ये शेतमजूर बनतील. त्यामुळेच आता शेतकऱ्यांसाठी “करा अथवा मरा’ची स्थिती निर्माण झाली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

ब्रिटीशांनी शेतकऱ्यांवर एका प्रमाणापेक्षा जास्त दडपशाही केलेली नव्हती. ब्रिटीशांनी रस्त्यांवर खिळे ठोकले नव्हते. त्यामुळे सध्याचे सरकार हे ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.