अफगाणिस्तानने ठोठावले संयुक्त राष्ट्राचे दार
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापतींनी केवळ भारताचीच डोकेदुखी होत नाही तर तिकडे अफगाणिस्तानलादेखील पाकचा त्रास होताना दिसत आहे. आता याच त्रासाच्या विरोधात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात संयुक्त राष्ट्रात मदत मागितली आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकच्या सैन्याने वारंवार नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच विरोधात अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्राला एक पत्र लिहीले असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
अफगाणिस्तानने 22 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्राला एक पत्र लिहून पाकच्या कुरापतींची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या तरतूदीत सामिल असलेल्या आर्टिकल 2 चे पाकिस्तानने पालन केले नसल्याचे अफगाणिस्तानकडून पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच अफगाणिस्तानने यावर कठोर शब्दात आपला निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचेही उल्लंघन करत असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणीही अफगाणिस्तानकडून करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या पूर्व भागामध्ये पाकिस्तानी लष्कर जबरदस्ती निर्माण कार्य करत असल्याचा आरोपही अफगाणिस्तानने केला आहे. तसेच आपल्या क्षेत्रात पाकिस्तान बॅरिअर्स उभारत असून पाकिस्तानी लष्कराची विमाने विना परवानगी आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करत असल्याचेही अफगाणिस्तानने म्हटले आहे.