फलकांवरून महापालिकेचे बोधचिन्ह गायब
पिंपरी – महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून नियमांचा भंग करण्याचे सत्र सुरुच असून आता तर त्यांनी विविध समितींचे नामफलक आपल्या पक्षाच्या ध्वजाच्या रंगाने रंगून टाकले आहेत. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले महापालिकेचे बोधचिन्ह लावण्याचाही भाजप पदाधिकाऱ्यांना विसर पडला आहे.
महापालिका समितीच्या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला महापालिका लोगो लावणे आवश्यक आहे. ही परंपरा आजपर्यंत सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षांने मोडलेली नाही. मात्र भाजपने याला तिलांजली देत आपल्या पक्षप्रेमाचे केविलवाणे प्रदर्शन केले आहे. याविरोधात आता शहरातील मनसे आक्रमक झाली असून हे फलक न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यापासून काही राजकीय पक्षांनी सत्ता भोगली. पक्षाचे नगरसेवक महापालिकेच्या समितीचे सदस्य झाले. काही सभापती झाले. मात्र त्यांनी कधीही आपल्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगात किंवा चिन्हाचा महापालिकेच्या कार्यालयामध्ये नामफलकावर वापर केला नाही. मात्र भाजपने एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिकेमधील स्थायी, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, विधी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी महापालिकेमध्ये सदस्यांच्या नावाचे फलक पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे केले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे सचिव रुपेश पटेकर म्हणाले की, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील कार्यालयांमध्ये पक्षांच्या झेंड्याच्या रंगाचे फलक लावले आहेत.
महापालिकेच्या नियमानुसार बोधचिन्हाचा कुठेही वापर केला नाही. त्यामुळे हे नामफलक काढून टाकावेत. अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवासस्थानाच्या पाट्या काढल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या होणाऱ्या खर्चातून भाजपने राजकीय पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे निवासस्थानाचे फलक बनविले होते. आयुक्तांच्या आदेशाने या पाट्या स्थापत्य विभागाने काढून टाकल्या होत्या. आता महापालिकेतीलही या नियमांचा भंग करणाऱ्या पाट्या काढून टाकाव्यात अशी मागणी केली जात आहे.