पिरंगुट (वार्ताहर) – होम क्वांरटाइन केलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याने मुळशी तालुक्यात चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.
नांदे (ता. मुळशी) येथील डांगेवस्तीमधील एक तर सुतारवाडी येथील तीन नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आल्याने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे हातावर शिक्के मारून 14 दिवस होम क्वांरटाइन करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान पौड पोलीस पेट्रोलिंग करत असताना संबंधितांच्या घरी जाऊन चेक केले असता त्या व्यक्ती घरी नसल्याचे आढळले, त्यामुळे या चारही व्यक्तींनी होम क्वारंटाइन आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार अब्दुल शेख, पोलिस कॉन्स्टेबल विनोद चौबे यांनी केली आहे.