भूजल संरक्षण नियमांचे दौंडमध्ये उल्लंघन

प्रशासनाचे दुर्लक्ष : विहिरी, कुपनलिका खोदताना कायद्याची अंमलबजावणी नाही

– विशाल धुमाळ

दौंड -दौंड तालुक्‍यात यावर्षी दुष्काळाची दाहकता अधिक जाणवत आहे. खडकवासलाचे आवर्तन कमी झाल्याने विशेषत: शेतीसह पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरही विहिरीच्या कामांबरोबरच कुपनलिका खोदण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आहे. परंतु, कुपनलिका खोदताना भूजल संरक्षण नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे दौंड तालुक्‍यात महाराष्ट्र भूजल विकास व्यवस्थापन विधेयकाच्या अंमलबजवाणीचे मोठे आव्हान अधिकाऱ्यांना आहे.

दौंड तालुक्‍यात पाणीपुरवठ्याच्या पर्यायी योजना ग्रामपंचायतीकडे नसल्याने तालुक्‍यात दुष्काळी गावांची संख्या मोठी आहे. यामुळे बहुतांशी गावातील नागरिकांनी स्वत:च्या मालकीच्या कुपनलिका खोदल्या आहेत. दौंडच्या पूर्वेकडील गावांचा विचार करता खासगी कुपनलिकांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासकीय परवानगी न घेताच कुपनलिका खोदण्यात येत आहेत, महाराष्ट्र भूजल विकास व्यवस्थापनच्या नियमांचा अधिकाऱ्यांनाच विसर पडला असल्याने त्याची अंमलबजावणी होणार तरी कशी? याच कारणातून बेकायदा कुपनलिका खोदणाऱ्या एकावरही प्रशासकीय कारवाई झालेली नाही. भूजल विकास नियमानुसार अतिशोषित आणि शोषित अशी पाणलोट क्षेत्रे आखण्यात आलेली आहेत. शोषित क्षेत्रांमध्ये 60 मीटरपेक्षाही खोल कुपनलिका खोदल्या जात नाहीत, भूजल विकासाच्या दृष्टीने हे योग्य नाही कारण त्यामुळे भूजल भरण आणि उपसा यांचे संतुलन राहत नाही. भूजल पातळी सातत्याने कमी होते. याकरिता कुपनलिका खोदताना संबंधीत खात्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

“ग्राउंड वॉटर’ आणखी कठोर व्हावा….
भूगर्भातून पाणी उपसा वाढत असून तेवढ्या प्रमाणात त्याचे पुनर्भरण होत नसल्याने महाराष्ट्रात ग्राउंड वॉटर कायदा 1994 मध्ये मंजूर झाला आहे. मात्र, याची अंमबजावणी होताना दिसत नाही. ग्रामीण भागात 700 मीटरमध्ये दुसऱ्या विहिरीस परवानगी नाही; पण, कोणी किती विहिरी खोदाव्यात, किती कुपनलिका घ्याव्यात त्याची खोली किती असावी याबाबत काहीच बंधने अथवा नियमावली नाही, त्यादृष्टीने ग्राउंड वॉटर कायदा आणखी कठोर होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह दिसून येत आहे.

जमिनीतून पाणी उपसण्याकरिता कोणताही कर नाही. यामुळेच जमिनीतून बेसुमार पाणी उपसा केला जातो. सध्या तरी पाणी फुकट मिळत असले तर याबाबत दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. याकरिता भूजल कायद्याची कडक अंमजबावणी करण्यावर आमचा नेहमीच भर असतो. यादृष्टिकोनातून संबंधीत विभागास सूचना देण्यात येतील.
– बालाजी सोमवंशी, तहसिलदार, दौंड

Leave A Reply

Your email address will not be published.