सातारा – येथील जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कामगाराने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी वैभव पवार (रा. खटाव) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सातारा शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव पवार जिल्हा रुग्णालयातील दंत विभागात कंत्राटी कामगार म्हणून नोकरीस आहे. गेली पाच महिने त्याच विभागातील डॉक्टर महिलेशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र, पिडीतेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पवारने अश्लिल शेरेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या पिडीतेने त्याला या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मी सिव्हील सर्जन’च्या जवळचा आहे,’ असे म्हणून पवार याने त्या महिलेवर दादागिरी करून माझ्या नादाला लागशील तर तुझी व तुझ्या नवऱ्याची बदनामी करून टाकीन, अशी धमकी दिली.
याची माहिती पिडीतेने वरिष्ठांना दिली मात्र, त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने पवार याचे धाडस वाढले. त्याने पुन्हा त्या महिलेला घाणेरडे शब्द वारपण्यास सुरूवात केली. मात्र, दि. 3 रोजी पवार याने सगळ्या मर्यादा ओलांडत रुग्णालयातच त्या महिलेचा विनयभंग केला. अखेर त्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात पवार याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.