प्रतिबंधात्मक आदेश असूनही यात्रा भरवली?

वाईमध्ये यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

वाई – राज्यात करोनाविषाणूमुळे पसरत असलेल्या कोव्हिड-19ची दुसरी लाट थैमान घालत असून देशात सर्वाधिक रुग्ण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आढळून येत आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्याही वाढते आहे. मात्र, राज्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांमध्ये या साथीच्या रोगाबाबत जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे, राज्य सरकारने कोणतेही धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली असताना, हे आदेश धुडकावून गावोगावी यात्रा साजरी करण्याची बेफिकिरी दिसून येत आहे.

एका ताज्या घटनेत, वाईजवळ असलेल्या पसरणी गावात ग्रामस्थांनी बगाड यात्रा भरवल्याने पसरणी यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. येथील काळभैरवनाथ बगाड यात्रेला नुकतीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदार भोसले यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून यात्रा कमिटीने काही मोजक्‍याच लोकांना घेऊन बगाड उभारले होते. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केल्याचे सांगितले जात आहे तर प्रशासनाने यात्रा कालावधीत धार्मिक विधी हा पुजारी व केवळ 5 लोकांनी करण्याचे आदेश असतानाही पसरणीतील यात्रा कमिटीने बगाडासाठी गर्दी जमविल्याचा ठपका ठेऊन तहसीलदार रणजित भोसले यांनी यात्रा कमिटीवर कलम 188 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काही तरुणांनी बगाडाचे फोटो व चित्रीकरण करुन ते व्हायरल केल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ही सर्वात मोठी यात्रा म्हणून पसरणीची यात्रा ओळखली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.