आचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) – शहरात विविध ठिकाणी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतन कसबे, काशिनाथ ठोंबरे, महिबूब पटेल यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पहिल्या घटनेत केतन कसबे (रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट बाजूला, दक्षिण सदर बझार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी रोहित चंदेले यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 एप्रिल रोजी घडली आहे.

कसबे यांनी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने दक्षिण सदर बाजार परिसरात डिजिटल फलक लावले आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा फोटो लावून आचारसंहितेचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फौजदार ईश्वर कोकरे तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत निवडणूक भरारी पथकातील अधिकारी प्रशांत बाळशंकर यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. काशिनाथ विठ्ठल ठोंबरे (रा. महिम, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मरीआई चौक परिसरामध्ये पोलिसांची नाकाबंदी असताना चारचाकी वाहनावर मनसे पक्षाचे झेंडे लावले होते. याशिवाय चालक ठोंबरे यांनी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे तक्रारीत म्हटले आहेत.

तिसऱ्या घटनेत भरारी पथकाचे अधिकारी वसंत पवार यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली आहे. महिबूब लाडले पटेल (रा. जनता कॉलनी, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मार्केट यार्ड परिसरातून जात असताना कारच्या नंबर प्लेटवर शिवसेनेचे स्टिकर लावले होते. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.