करोनासंबंधी नियमांची पायमल्ली करणं मंगल कार्यालयांना पडलं महागात

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंगल कार्यालयाची पाहाणी केली. त्यातील दोन मंगल कार्यालयात शासनाच्या नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे त्या मंगल कार्यालयावर तहसीलदार देवरे यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच यापुढे नियमाचे पालन न केल्यास मंगल कार्यालय सील करण्यात येतील, असा इशारा देवरे यांनी दिला आहे.

सध्या करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार यांना यासंदर्भात उपाययोजना करण्याचे सूचना केल्या आहेत. त्यानुसार तालुक्यात होणार्‍या लग्न समारंभामध्ये तहसीलदार देवरे यांच्या पथकाने भेटी दिल्या.

त्यामध्ये पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय व मणकर्णिका मंगल कार्यालय यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच यापुढील काळामध्ये लग्न समारंभामध्ये जास्तीची उपस्थिती राहिल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येण्याचा इशारा देवरे यांनी दिला आहे.

तहसीलदार यांच्या पथकाने कारवाई केली, त्यावेळी मंगल कार्यालयामध्ये चारशे लोकांची उपस्थिती होती. तसेच अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. तसेच काही कार्यालय मालकांनी सांगितले की, आम्ही टप्प्याटप्प्याने लोकांना सोडत आहे.

मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियमाचे पालन होत नव्हते. तसेच शासन नियमाप्रमाणे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना लग्न समारंभात उपस्थित राहण्याचा आदेश नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही युक्तीवाद ऐकून घेण्यात येणार नाही, असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.