पुणे – इंडियन बॅंक, मर्स्क, स्प्रिंगर नेचर या संघांनी प्रथम व्हिन्टेज आय टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
इंडियन बॅंकेने अटॉस सिंटेल संघावर 62 धावांनी मात केली. प्रत्येकी 17 षटकांच्या झालेल्या या लढतीत इंडियन बॅंक संघाने प्रथम फलंदाजी करताना अर्जुन शिंदेच्या शतकाच्या जोरावर 4 बाद 153 धावा केल्या. अर्जुनने 65 चेंडूत 11 चौकार व 6 षटकारांसह 107 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अटॉस सिंटेल संघाचा डाव 13.1 षटकांत 91 धावांत संपुष्टात आला.
कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या लढतीत मर्स्क संघाने सायमनटेक संघावर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मर्स्क संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 147 धावा केल्या. यात दिनेश वाडकरने 35 चेंडूंत 45, हितेश पांचाळने 29 चेंडूंत 42, तर वैभव महाडिकने 30 चेंडूंत 35 धावा केल्या. आघाडीच्या फलंदाजांनी मर्स्कला चांगली सुरुवात मिळवून दिली होती.
मात्र, आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले आणि इतरांनी निराशा केली. प्रत्युत्तरादाखल सायमनटेक संघाला 7 बाद 140 धावाच करता आल्या. यात हृषिकेश पटवर्धनची एकाकी झुंज अपयशी ठरली. हृषिकेशने 48 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारसह 62 धावा केल्या.
तिसऱ्या लढतीत स्प्रिंगर नेचर संघाने आयडीयाज संघावर 30 धावांनी मात केली. स्प्रिंगर नेचर संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 143 धावा केल्या. आयडियाज संघाला 4 बाद 113 धावाच करता आल्या.