Vinesh Phogat CAS Hearing : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला 50 किलो वजनी गटात कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते, मात्र अंतिम फेरीच्या दिवशी तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेशने तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे ( CAS : Court of Arbitration of Sport) आवाहन केले होते. विनेश फोगटचा खटला भारतातील सर्वात मोठे वकील हरीश साळवे लढत आहेत.
कुस्तीपटू विनेश फोगटच्या ऑलिम्पिक अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर क्रीडा लवाद न्यायालय (CAS) शनिवारी (10 आॅगस्ट) रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता निकाल देणार होते. आता, या संबंधी क्रीडा लवादाच्या न्यायालयाने (CAS) एक प्रेस विज्ञप्ति (प्रेसनोट) जारी केली आहे. त्यामध्ये विनेश फोगटच्या खटल्याची निकालासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे.
‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल….
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सह संपूर्ण भारत देश रौप्य पदक देण्याच्या याचिकेवर क्रीडा लवाद न्यायालय (CAS) काय निर्णय देते याची प्रतीक्षा करत आहे. त्याबदल मोठी अपडेट समोर आली आहे. क्रीडा लवाद न्यायालय (CAS) ने निर्णयाची तारीख 11 ऑगस्टपर्यंत वाढवल्यामुळे विनेशसह भारताची प्रतीक्षा वाढली आहे.
क्रीडा लवादाच्या न्यायालयाने (CAS) एक प्रेस विज्ञप्ति (प्रेसनोट) जारी केली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की,” आता निर्णय 11 ऑगस्ट रोजी घोषित केला जाईल, म्हणजेच विनेशला आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागेल.” जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, आता विनेश फोगटच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येईल, परंतु निर्णयाशी संबंधित तपशीलवार माहिती 13 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या, युक्तीवादादरम्यान विनेशच्या बाजूने काय सांगण्यात आले?
वृत्तानुसार, सुनावणीत विनेश फोगटकडून अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. ज्यामध्ये विनेश फोगटने कोणतीही फसवणूक केलेली नाही, हे स्पष्ट आहे, त्यामुळे तिला रौप्य पदक देण्यात यावे, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्यात आला. दुसरी बाजू अशी मांडण्यात आली आहे की, विनेश फोगटचे वजन वाढणे ही शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती.
याशिवाय, खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. चौथ्या आणि शेवटच्या युक्तिवादात असे म्हटले आहे की, पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा कमी होते. आणि स्पर्धेदरम्यान पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हा कुस्तीपटूचा मूलभूत अधिकार आहे.
सुमारे तासभर चालला युक्तीवाद…
वृत्तानुसार, या प्रकरणाच्या सुनावणीत सुमारे तासभर चर्चा झाली. आता यावर आज निर्णय होणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्यातील चर्चा सुमारे तासभर चालली. यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी विनेश फोगट हे प्रकरण CAS कडे नेण्यास विरोध करताना दिसले होते. ते म्हणाले होते की, हे सर्व युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या नियमांनुसार होत आहे. अशा स्थितीत विनेशला रौप्यपदक मिळण्याची फारशी आशा दिसत नाही.