नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला चमकदार कामगिरी करण्यात आलेले अपयश तसेच तिने या स्पर्धेदरम्यान केलेले गैरवर्तन अत्यंत गंभीर्याने घेण्यात आले असून भारतीय कुस्ती महासंघाने तिला निलिंबत केले आहे. विनेशकडून या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, तिला अपयश आल्यामुळे महासंघाने इतके कठोर पाऊल उचलले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्व खेळाडू क्रीडाग्राममध्ये राहत होते तसेच एकत्रीतपणे सरावही करत होते. विनेशने मात्र, क्रीडाग्राममध्ये राहण्यास नकार देतानाच अन्य खेळाडूंबरोबर सराव करणार नाही, असेही सांगितले होते. तसेच संघाच्या अधिकृत प्रायोजकांची जर्सीही परिधान करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान विनेशच्या गैरवर्तनावर बरीच चर्चा रंगली होती.
एक खेळाडू म्हणून खेळावर लक्ष केंद्रित करायचे सोडून तिने या अन्य गोष्टींतच वाद घातल्यामुळे महासंघही नाराज होता. त्यामुळेच महासंघाने आता विनेशला निलंबित केले आहे. त्याचबरोबर विनेशला आता कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
विनेशने दिलेल्या उत्तरावर चर्चा केल्यावरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही महासंघाने सांगितले आहे. तिने दिलेल्या उत्तराने महासंघाचे समाधान झाले नाही तर तिला आगामी कुस्ती स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी नाकारण्यात येणार आहे. तसेच महासंघाने सांगितल्याशिवाय तिला कोणत्याही राष्ट्रीय किंवा स्थानिक कुस्ती स्पर्धांमध्ये खेळता येणार नाही.
विनेशचे हे वर्तन बेशिस्त असल्याचे महासंघाने म्हटले असून ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत आपण देशाचे नेतृत्व करत असताना एकसंघपणे वर्तन केले पाहिजे. मात्र, विनेशने हे संकेतच पाळले नाहीत. त्यामुळेच तिला निलंबित करण्यात आले असून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, असे महासंघाने म्हटले आहे.