मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी इच्छाही विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे.
राजीनामा दिल्यानंतर मेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीचा अध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला आहे. कारण सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच-तीन महिने झाले तरी कोणतेही आढावा बैठक नाही किंवा आढावा घ्यावा असे वाटत नाही. अनेक केसेस या विरोधात सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात, हरित लवादाकडे आहेत. या केसेस गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे, पण लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा दिला आहे. आता मी बाजूला झालो आहे. आता तरी लवकर याबाबतच काम व्हावे, असे माझे म्हणणे आहे, असे मेटे यांनी सांगितले.