अतिरिक्त आयुक्त आगरवाल यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांसह समारोप
– संदीप घोडके
येरवडा – करोना संकटाच्या काळात महापालिकेचे आरोग्य, अभियंता, शिक्षण, पीएमपीएल, बालवाडी, अंगणवाडी कर्मचारी, सफाई कर्मचारी याचबरोबर भारतीय जैन संघटना, जानकीदेवी बजाज फाउंडेशन, इस्कॉन टेम्पल यासारख्या स्वयंसेवी संघटनांनी एकजुटीने काम केल्याने नगररोड येथील करोना रुग्णाचा आकडा कमी करण्यात यश आल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी सांगितले. रुग्ण कमी झाल्याने विमाननगरचे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहे. सेंटरच्या समारोपप्रसंगी आगरवाल बोलत होत्या.
विमानगर येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरचे काम साडेतीन महिन्यानंतर बंद करण्यात येत असल्याने कोविड सेंटरचा समारोप उपायुक्त तथा नियंत्रण प्रमुख माधव जगताप,परिमंडल-1चे उपायुक्त विजय दहिभाते, नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे माजी सहायक आयुक्त राजेश बनकर, कार्यकारी अभियंता सुनील यादव, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे, डॉ.स्वाती माळी, डॉ. सुजाता माने, डॉ.संगीता भारती, उपअभियंता चंद्रकांत दुदुस्कर, बीजेएसचे अशोक पवार, औषध वितरक युवराज नातु, लुंकड झोडियाक सह. गृहरचना संस्थेचे अध्यक्ष रूपचंचलाणी, कार्यालय अधीक्षक संजय खाडे, इस्कॉनचे प्रतिनिधी यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, पीएमपीएलचे कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.
8358 रुग्णांवर यशस्वी उपचार…
करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने शहरातील सर्वात मोठे कोविड सेंटर बंद करण्यात आले. जवळपास साडेतीन हजार रुग्ण क्षमतेचे सेंटर दि. 16 जुलै 2020ला हे सेंटर सुरू करण्यात आले. सुरुवातीला 20 ते 25 रुग्ण असणाऱ्या सेंटरमध्ये जवळपास आतापर्यंत 8 हजार 358 रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. यामध्ये एकही रुग्ण दगावला नाही.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना औषधे, जेवण त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली गेली. ड्युटी आहे म्हणून काम करायचे, असे न करता प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांने जीव ओतून काम केल्याने करोना रुग्णावर चांगले उपचार करता आल्याचे या कोविड सेंटरचे नियंत्रण प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.