बारामती (प्रतिनिधी) – बारामतीतील कोरोनची वाढती दहशत पाहता जळोची येथील युवकांनी एकत्र येत गावाच्या व शहराच्या सुरक्षेसाठी गावातील प्रमुख रस्ते बंद करत नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे घरोघरी जाऊन आव्हान केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत परिसरातील महिला ज्येष्ठ व तरुणांनी घरातून बाहेर न पडण्याची ग्रामदेवताची शपथ घेतली आहे.
पोलीस प्रशासन व आरोग्य कर्मचारी यांच्यावरील वाढता तान कमी करण्याच्या हेतूने युवकांनी एकत्र येत पोलिस बांधवांना सहकार्य व मदत करण्याचे ठरविले आहे. मोकाट फिरणाऱ्या लोकांची यादी बनवून पोलिसांना व प्रशासनाला देण्याची युक्ती तरुणांनी गावासमोर मांडली व गावाने देखील एक मताने ठराव करून या युक्तीला मान्यता दिली. गावातील या भूमिकेचे प्रशासन स्तरावरून कौतुक होत आहे. गावातील तरुण घरोघरी जाऊन लोकांचे मनोबल वाढवत कोरोनासाठी लागणारा मदत निधी देखील जमा करून प्रशासनाकडे सुपूर्द करण्याचे युवकांनी ठरविले आहे.
तसेच गावातील प्रत्येक पाच युवक दररोज या कामासाठी पुढे येवून जनजागृती करण्याचे काम करणार असून प्रशासनाने सांगीतलेल्या उपाय-योजना व सूचना गावातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम येथील युवक करत आहेत. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी व युवक उपस्थित होते. यावेळी सोशियल डिस्टन्स देखील पाळला गेला.