चाकण नगरपरिषद हद्दवाढीस खालुंब्रे ग्रामस्थांचा विरोध

महाळुंगे इंगळे – चाकण नगरपरिषदेमध्ये खालुंब्रे (ता. खेड) या गावाचा समावेश करण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार आदींकडे पत्रव्यवहार करून खालुंब्रे ग्रामपंचायतीने चाकण नगर परिषदेमध्ये या गावाचा समावेश न होणे बाबत हरकती नोंदवल्या असल्याची माहिती खालुंब्रे गावच्या सरपंच सोनल बोत्रे व उपसरपंच संदीप येळवंडे यांनी दिली.

चाकण परिसराचा दिवसागणिक विस्तार होत असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढत आहे. यासाठी पुरेशा सुविधा मिळाव्यात, म्हणून हद्दवाढ गरजेची आहे. असे सांगत खालुंब्रे या गावचा समावेश चाकण नगरपरिषदेत करावयासाठी ग्रामस्थांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यास खालुंब्रे गावच्या ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला आहे.

चाकण नगरपरिषदेत आम्हाला जायचे नाही, असा ठाम निर्धार खालुंब्रेकर ग्रामस्थांनी केला आहे. नगरपरिषदेला फक्त आमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर डोळा आहे. आम्ही आमच्या गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. संबंधित गावामधील अंतर्गत रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन व आरोग्य या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आम्ही आमचा विकास करण्यास सक्षम असल्याचे सरपंच सोनल बोत्रे व उपसरपंच संदीप येळवंडे यांनी सांगितले. चाकण नगरपरिषदेच्या अशा मागणीमुळे ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

वेळ आली तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. बांधकाम क्षेत्रात नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयांची विकास कामे करतात. हे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर विभाग निहाय उपअभियंता व भागनिहाय शाखा अभियंता असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शासन निकषांनुसार ही कामे केली जातात. त्यामुळे चाकण नगरपरिषदेमध्ये समावेश होण्यास आमचा स्पष्ट नकार आहे.

खालुंब्रे गावचा विकास नियोजनबद्ध रित्या सुरू आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींच्या माध्यमातून गावामध्ये लोकोपयोगी कामे सुरू आहेत. नगरपरिषदेने पहिल्यांदा शहरातील विकास कामे करावीत, मग हद्दवाढीची मागणी करावी. आमचा या हद्दवाढीला ठाम विरोध आहे.
– सोनल बोत्रे, सरपंच, खालुंब्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)