नेवासा : शिंगवे तुकाई (ता.नेवासा) हे गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पाट – पाण्यापासून वंचित असल्यामुळे या गावाला वांबोरी चारी टप्पा दोनचे पाणी मिळण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले गांवकऱ्यांचे उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,नेवासा तहसिलदार डॉ.संजय बिरादार भाजपाचे युवानेते सचिन देसरडा यांच्या उपस्थितीत आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी शिंगवेतुकाई हे गांव या योजनेत सामाविष्ठ करण्यासाठी प्राधान्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल या गावावर कुठलाही अन्याय होणार नाही याची निश्चितपणे दक्षता घेतली जाईल असा विश्वास आमदार लंघे – पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिला.
त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले शिंगवेतुकाई येथील आमरण उपोषण सोडविण्यात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना अखेर यश आले. शिंगवे तुकाई येथील गावकऱ्यांनी तरुणांना संदेश देत “उठा तरुणांनो जागे व्हा…., संघर्षाचे धागे व्हा म्हणत गावातील मंदिरात पांडूरंग होंडे,संकेत पवार,स्वप्निल पवार,नवनाथ पवार, कारभारी पवार, पांडूरंग पवार, ज्ञानदेव पवार,दत्तात्रय पवार, अनिल होंडे,प्रवीण गायकवाड,प्रवीण पवार,सुदामराव पवार,संभाजी होंडे, विठ्ठल पवार,भाऊसाहेब पवार,आदिनाथ पवार, रविंद्र पवार,उद्धव पवार,गणेश भिसे,संतोष पवार,अमोल पवार या ग्रामस्थांनी वांबोरी चारीचे पाणी गावाला मिळण्यासाठी सोमवार (दि.१०) रोजी पासून उपोषण सुरु केले.
या उपोषणाची दखल घेत आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,नेवासा तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांनी रविवार (दि.१६) रोजी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी उपोषणकर्त्यांची यशस्वी मध्यस्थी करत तालुक्यातील या शिंगवे तुकाई गावाला पाटपाणी मिळण्यासाठी आपण राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत. या तालुक्यातील आपल्या गावावर अन्याय होणार नाही यासाठी आपण विशेष लक्ष घालणार असल्याचे आश्वासन आमदार लंघे – पाटील यांनी दिल्यामुळे सहा दिवसांपासून सुरु असलेले हे उपोषण यशस्वी मध्यस्थीनंतर सोडण्यात यश आले.